माझी मैत्रीण त्यादिवशी म्हणत होती, की 'Third World' मधून आल्यावर आपल्या धर्माविषयी, संस्काराविषयी नवोदित जाज्वल्य अभिमान निर्माण होतो. प्रत्येकाच्या बाबतीत हे खरे नसेलही, पण हा बदल माझ्यात मला जाणवला.
लंडन आणि सिंगापूर दौर्यानंतरच हे प्रकर्षाने जाणवले की भारताबाहेर नांदणे नाही. आणि तेव्हा हे ही उमजले - की बहुदा बहुतांश आयुष्य भारताबाहेर ह्या मानसिक कोलाहलात घालवावे लागणार! 'Man proposes, God disposes' ही आस्तिकता मनात पक्के घर करून राहिली.
आता कॅल्गरीत आल्यावर भारताची ओढ जाणवते.
भोगोलिक विस्तारापेक्षा भारतिय विचार, तत्त्वज्ञान, श्रद्धास्थान आणि तेथील पोक्तपणा जास्ती आठवतो. किंबहुना त्याचे आजच्या काळातील संबंध आणि संदर्भ चपखळ बसतात असे वाटते.
सांख्य-योग, न्याय-वैशेषिख अशी नावे न देता ही ते 'भारतीय' विचार आपलेसे वाटतात.
अखेर, पंखातले बळ अजमावत असताना आपल्या पाळा-मुळांची ओढ जाणवते.
सूर्य तोच, आणि चंद्रही तोच असलातरी संदर्भ पूर्ण बदललेला! शरद पौर्णिमेच्या रात्री इथे चंद्र बर्फाच्या चादरी आडून किंवा ढगातुन दर्शन देतो. सूर्य हात-पाय गळ्यासारखा फक्त आकाशाच्या फलकावर पुढे सरकत जातो... उब काही देत नाही.
मेल्स मध्ये म्हणूनच कटाक्षाने "Warmly" असे लिहिते... कारण ती ऊब निदान माणसांच्या संपर्कातून मिळावी ही भाबडी अशा!
येथील झाडे जेव्हा रंग बदलतात, तेव्हा माणसेही त्यांचा जगण्याची रीत मोडतात. आणि झाडे निष्पर्ण झाली की माणसे ही बर्फाच्या धुक्याआड जातात.
साथीला मग चॉकलेट, टीव्ही आणि मिणमिणता दिवा तेवढा राहतो. तेव्हा खरी उब देतात ते भारतीय विचार!
कॅलगरीत येऊन मी जास्त भारतीय, प्रांजाळपणे हिंदू आणि अभिमानी मराठी मुलगी झालीये...
No comments:
Post a Comment