Monday, July 10, 2017

एक चित्र

शेवटी हस्ताक्षर केले : दुर्गा, पिट्सबर्ग  आणि आजची तारीख.
निळ्या रंगात ती पांढरी अक्षरे उठून दिसत होती. आणि त्यापेक्षाही उठून दिसत होते माझे 'मी 'पण .
गेले काही वर्ष हे पैंटिंग मी अर्धवट गुंडाळून ठेवले होते.
त्यातले आर्त भाव कमी झाले होते असे नाही, पण अधूनमधून डोकावणारा न्यूनगंड आणि इतर कामांना दिलेले प्राध्यान...
एकदाच्या माझ्या पंच कन्या कॅनवास वर अवतरल्या!

ह्या पंच महाभूतांच्या माध्यमातून प्रत्येक शक्तीची स्वाभाविक रूपे ह्या रचनेत आहेत. माझ्या डोळ्याला दिसणाऱ्या ह्या पाच शक्ती नारीस्वरूप आहेत. एकमेकांत गुंतलेल्या नसल्या तरीही एकमेकींवर विसंबून आहेत. पाण्याची खोलाई जशी पृथ्वी च्या भुपटवरच्या खाचखळग्यांवर ठरते, तसे अवकाश आपल्याला तेजाच्या साहाय्याने अनुभवता येते, व हे तेज वायू मुळेच आपल्यापर्यंत पोहोचते... एकाच मूलगर्भातून निर्माण होणाऱ्या ह्या पाच शक्ती परत तिथेच विलीन होतील अशीही कल्पना आहे. धरतीच्या बरोबरीला हात आहेत, जणू असे की पृथ्वी आपल्याला बाकी चार शक्तींचे आकलन करण्यास सहाय्य करते.
मध्ये मध्ये सुक्ष्म मानव प्रत्येक शक्तीच्या अवती भवती आहेत, ते आपणच! शक्तीला कवेत घेण्याच्या प्रयत्नात!

पृथ्वी 

पृथ्वी वरची सृष्टी 

वायू 

वायू आणि अग्नी - मागे आठ चक्र (ऊर्जेचे स्रोत )

अवकाश (त्यात काही नक्षत्रे )

जल 

एकाच मूलागर्भातून येणारी ही पाच तत्त्वे - त्यांचे आपसाथचे अनुसंधान  (आयुष्याचे पुर्ण वर्तुळच जणू )

Thursday, April 27, 2017

देशाटनाने भारतीय

माझी मैत्रीण त्यादिवशी म्हणत होती, की 'Third World' मधून आल्यावर आपल्या धर्माविषयी, संस्काराविषयी नवोदित जाज्वल्य अभिमान निर्माण होतो. प्रत्येकाच्या बाबतीत हे खरे नसेलही, पण हा बदल माझ्यात मला जाणवला. 
लंडन आणि सिंगापूर दौर्यानंतरच हे प्रकर्षाने जाणवले की भारताबाहेर नांदणे नाही. आणि तेव्हा हे ही उमजले  - की बहुदा बहुतांश आयुष्य भारताबाहेर ह्या मानसिक कोलाहलात घालवावे लागणार! 'Man proposes, God disposes' ही आस्तिकता मनात पक्के घर करून राहिली. 
आता कॅल्गरीत आल्यावर भारताची ओढ जाणवते. 
भोगोलिक विस्तारापेक्षा भारतिय विचार, तत्त्वज्ञान, श्रद्धास्थान आणि तेथील पोक्तपणा जास्ती आठवतो. किंबहुना त्याचे आजच्या काळातील संबंध आणि संदर्भ चपखळ बसतात असे वाटते. 
सांख्य-योग, न्याय-वैशेषिख अशी नावे न देता ही ते 'भारतीय' विचार आपलेसे वाटतात. 
अखेर, पंखातले बळ अजमावत असताना आपल्या पाळा-मुळांची ओढ जाणवते. 
सूर्य तोच, आणि चंद्रही तोच असलातरी संदर्भ पूर्ण बदललेला! शरद पौर्णिमेच्या रात्री इथे चंद्र बर्फाच्या चादरी आडून  किंवा ढगातुन दर्शन देतो. सूर्य हात-पाय गळ्यासारखा फक्त आकाशाच्या फलकावर पुढे सरकत जातो... उब काही देत नाही. 
मेल्स मध्ये म्हणूनच कटाक्षाने "Warmly" असे लिहिते... कारण ती ऊब निदान माणसांच्या संपर्कातून मिळावी ही भाबडी अशा!
येथील झाडे जेव्हा  रंग बदलतात, तेव्हा माणसेही त्यांचा जगण्याची रीत मोडतात. आणि झाडे निष्पर्ण झाली की माणसे ही बर्फाच्या धुक्याआड जातात. 
साथीला मग चॉकलेट, टीव्ही आणि मिणमिणता दिवा तेवढा राहतो. तेव्हा खरी उब देतात ते भारतीय विचार!
कॅलगरीत येऊन मी जास्त भारतीय, प्रांजाळपणे हिंदू आणि अभिमानी मराठी मुलगी झालीये... 

Thursday, April 20, 2017

आजोबा

दिवा म्हणतो वात दे...
माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा हात दे... (कुसुमाग्रज)

आजोबांच्या आठवणीत असे खोल बुडून गेल्यासारखे वाटते.
त्यांच्यामुळे जे घराला घरपण होते. जसा जीवाला जीव होता, आणि माझ्यासारख्या नातीला जसा जीवनभराचा आधार वाटे ते  अचानक कुठेतरी विरघळून गेले...
कल्पवृक्ष कोसळला तेव्हा सारी पाखरे उडाली.
मी ही त्यातलीच.
मागे वळून पाहायचे नाही, असे मनाशी पक्के ठरवून फड फड करत निघाले.
आजोबा गेले होते, पण आठवणी आणि जखमा तेवढ्या होत्या.
कल्पवृक्षाखालच्या नवीन झाडांना विसरले होते असे नाही; शेवटी तेच अन्नदाते होते. पण कल्पवृक्षाच्या शक्तीशाली फांद्यांवर बेलाशक झुलणे, फुलणे काही औरच!
मी उडाले खरी, पण वृक्षासह माझे खूपसे पंखही झडले होते. मी सर्वशक्तीनिशी पुढे तर जात होते, पण खूप अंतर मात्र सर करत नव्हते.
काय असे पाश होते?
वृक्षाची एक सजीव शाखा. माझी आजी.
काही वर्षात ती शाखा ही झडली.
मग पाय मोकळे होते, पण हृदयाचे ओझे वाहणे तरीही कठीण.
आता  आई-बाबांना सोडून जायचे, तेही फक्त पंखातले बळ आजमावण्यासाठी ?
वृक्ष पडला. शब्द विरला.
पण तो पापा हवेवर तरंगत राहिला...
आजोबांचा, आजोबांसाठी.
आणि त्याबरोबर पंखात बळ हि आले. दूर उडून जाऊन परत माघारी येण्याचे.
शेवटी आपण गलबतावरचे जहाज. कारण आपण सारे अर्जुन!


Monday, April 17, 2017

शब्द

शब्द म्हणून शब्द पोरका.
त्यास नाही अर्थ वेगळा.
ज्या ओळीवर बसून तो मनमुराद हसवतो, त्याच ओळीच्या अखेरीस अश्रू ढाळतो.
अर्थानी त्यास मातृत्व लाभते आणि स्वरांनी त्याचे आंदण भरते.
ताऱ्यांच्या समूहात येणारा एक ध्रुव - तसाच हा अढळ शब्द
कधी माता तर कधी सखी
कधी निरामय आणि शुद्ध
तर कधी बुरसटलेला, अन ज्वालाग्राही.
शेवटी शब्दच.


Saturday, April 15, 2017

स्वैर मन

स्वैर उडावे.
स्वैर बसावे.
तरी मनास ह्या सतत बंधनात ठेवावे.
स्वैर ते उडून
बसण्यास माघारी येणार नाही.
अन त्याशिवाय ही रिक्त जागा कधीही भरली जाणार नाही.
त्यास सोडले एकदा चुकुनि.
चाहूल लागताच घेतले परत ओढुनी.
त्याच क्षणी पटली ओळख.
त्याच्या स्वैर भटकण्याची
अन माझ्या घट्ट आवळण्याची.